Publish Date: Fri, 08 Mar 2024 (09:02 IST)
Updated Date: Fri, 08 Mar 2024 (09:07 IST)
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने अब की बार ४०० पार असा नारा दिला आहे. त्यांची सगळी मदार ईव्हीएम मशिनवर आहे. ईव्हीएममध्ये गडबड केल्याशिवाय हे अशक्य आहे, असा दावा करताना, ईव्हीएम मशिन कशी हॅक कशाप्रकारे होऊ शकते याचे सादरीकरण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले. ईव्हीएममधील हॅकिंग थांबविण्यासाठी मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती पडताळणीसाठी मतदारांना मिळायला हवी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
महाआघाडीत वंचितच्या समावेशाबद्दल अजूनही बोलणी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम मशिन कशी हॅक केली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या नंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती मतदारांना मिळायला हवी. त्याची पडताळणी केल्यानंतर ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी. या संदर्भात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटून ही मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Edited By - Ratnadeep Ranshoor