Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिकी यात्रेसाठी दर्शनरांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात, पहिल्यांदाच 10 विश्रांती कक्ष उभारणार

vitthal pandharpur
, शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (19:35 IST)
पंढरपूर : कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या 10 ते 12 लाख भाविकांना देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर समितीने गोपाळपूर येथे 10 पात्र शेड उभारले असून दर्शन रांग सात किलोमीटर पर्यंत उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कार्तिकी सोहळ्यासाठी येणारे  भाविक हजारोच्या संख्येने दर्शन रांगेत उभे असतात.
 
यावेळी या भाविकांना दर्शन रांगेत निवारा मिळावा, पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार अद्ययावत अशी दर्शन रांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .
 
तसेच कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथे 10 पत्राशेड उभारण्यात आली असून यंदा प्रथमच दर्शन रांगेत 10 ठिकाणी भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम सुरु आहे.
 
दर्शन रांगेत दमलेल्या वृद्ध भाविकांना येथे रांगेतून येऊन विश्रांती घेता येणार असून येथे त्यांना चहा पाणी, वैद्यकीय उपचार याची व्यवस्था केली जाणार आहे. वृद्ध भाविकांना त्रास जाणवू लागताच तातडीने या विश्रांती कक्षात आणून त्यांना वैद्यकीय उपचार दिले जातील. अशा भाविकांना विश्रांती कक्षात येताना टोकन देण्यात येणार असून पुन्हा त्यांना त्यांच्या जागी दर्शन रांगेत जात येणार आहे.  
 
एकंदर यंदा कार्तिकी यात्रा विक्रमी भरण्याचा अंदाज असून त्यासाठी प्रशासनाने दर्शन व्यवस्थेवर भर देताना कोठेही घुसखोरी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे .
 
मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा
कार्तिकी एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दर्शन रांगेत दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने येथेही हजारो भाविक घुसखोरी करीत असल्याने हे अंतर कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कार्तिकी यात्रेत देशभरातील लाखो भाविक येत असताना यासाठी जिल्हाधिकारी चार दिवस पंढरपूर मध्ये मुक्कामी थांबणार आहेत. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये येत असतात , यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे .
 
त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी होत असून या यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना यामुळे दिवसरात्र दर्शन घेता येणार आहे.
 
कार्तिकी यात्रा संपल्यानंतर 1 डिसेंबर रोजी विठूरायाची प्रक्षाळ पूजा होणार असून या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरु होतील चोवीस तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे .
 
इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजता मंदिर बंद होत असते . आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा , दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्या साठी दर्शन बंद राहणार असून उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Cricket World Cup 2023 Prize Money विजेत्याला 33 कोटी रुपये मिळतील