Publish Date: Thu, 18 Jan 2018 (09:43 IST)
Updated Date: Thu, 18 Jan 2018 (09:44 IST)
धुळे आणि शिरपूरमध्ये आज आयकर विभागाने कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आणि उद्योजक अमरिश पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रासह उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारीप्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांसह व्यापारी आणि उद्योजकांच्या निवासस्थानी व कार्यालयात आयकर विभागाकडून तपासणी सुरु आहे.
आयकर विभागाने राजवर्धन कदमबांडे यांच्या धुळ्यातील, तर अमरिश पटेल यांच्या शिरपूर इथल्या निवासस्थानी आज सकाळी 9 च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. दोन्ही ठिकाणी सुरु असलेल्या चौकशी पथकात सुमारे 25 पेक्षा अधिक सदस्य आहेत.
मात्र, धुळे जिल्ह्यात एकाच वेळी दोन नेत्यांच्या घरी छापेमारी सुरु झाल्याने राजकीय आणि उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे.