Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई हा त्यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे?

pankaja munde
, मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (23:03 IST)
प्राजक्ता पोळ
“दुष्काळ आणि आर्थिक कारणांमुळे अनेक कारखाने अडचणीत आले. सर्वांनीच दिल्लीत केंद्र सरकारकडे मदत मागितली. पण वैद्यनाथ साखर कारखाना सोडून इतर सर्वांना मदत मंजूर झाली आहे. मी एक सहनशील कन्या आहे. परिस्थितीतून संघर्ष करून मी मार्ग काढेन.” असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या.
 
परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या पंकजा मुंडे चेअरमन आहेत. या कारखान्याचा 19 कोटी रूपये जीएसटी थकीत असल्यामुळे जीएसटी आयुक्तांनी कारखान्याला नोटीस जारी केली आहे.
 
वैद्यनाथ साखर कारखान्याबरोबर इतर काही कारखान्यांना या परिस्थितीत केंद्र सरकारने मदत केली.
 
पण भाजपच्या राष्ट्रीय सचिव असूनही पंकजा यांच्या कारखान्याला मदत का करण्यात आली नाही? पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे का?
 
याबाबतचा हा आढावा …
 
काय आहे प्रकरण?
परळी तालुक्याती पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत. हा कारखाना दीड वर्षांपासून बंद आहे. या कारखान्याचे साहित्य पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे.
 
या कारखान्याकडे जीएसटी 19 कोटी रूपयांची रक्कम थकीत आहे. सहा महिन्यांपूर्वी जीएसटी अधिकाऱ्यांनी कारखान्यात येऊन धाड मारली. त्यानंतर 19 कोटी रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस दिली. अन्यथा मालमत्ता जप्ती करण्यात येणार असल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.
 
हा कारखाना सध्या बंद असून एका बॅंकेच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. बॅंकेकडून या कारखान्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. पण हा लिलाव झाला नाही. जर ही रक्कम भरली नाही तर कारखान्यातील काही मशिनरी जप्त करण्यात येणार असल्याचं 23 तारखेला दिलेल्या नोटीसमध्ये सांगतलं आहे.
 
या संदर्भातील एक पत्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी गेटवर लावले आहे. पण याबाबत अधिकृतपणे बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. जप्त केलेल्या मशिनरीचा लिलाव करून कर वसूली करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
 
पंकजा मुंडेंची अमित शहांवर नाराजी?
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कारखान्याच्या जप्तीवर बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, “जे आकडे सांगितले जातात, ते व्याजाबाबत आहेत. कुठेही काहीही चुकीचं झालं नाही. कारखाना तोट्यात असतानाही शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत. दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चालला नाही.
 
8 ते 9 कारखान्यांनी दिल्लीत मदत मागितली होती. त्यात माझेही नाव होतं. पण मी सोडून बाकींना आर्थिक मदत झाली. मदत मिळाली असती, तर हे प्रकार घडले नसते.”
 
केंद्रात सहकार खातं हे अमित शहा यांच्याकडे आहे. जर महाराष्ट्रातील 8-9 साखर कारखान्यांना मदत करण्यात आली तर पंकजा मुंडे यांच्याच कारखान्याला मदत का करण्यात आली नाही? मदतीचे निकष नेमके काय आहेत? की पंकजा यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य केलं जात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
पण भाजपकडून याबाबत अद्याप कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. पंकजा यांची राज्यभर ‘शिवशक्ती परिक्रमा यात्रा’ सुरू आहे. त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केलेल्या या राजकीय यात्रेमुळे त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली विरोधकांकडून जात आहे.
 
पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे म्हणातात, "पंकजा मुंडे यांनी काढलेली शिवशक्ती परिक्रमा यात्रा सरकारच्या काही लोकांना आवडली नसावी आणि आकस बुद्धीने त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई केली असावी".
 
सुप्रिया सुळे यांनी निष्ठावंताची गळचेपी सुरू असल्याची टीका केली आहे. सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "जुन्या हिंदी सिनेमातील 'अपनों पे सितम,गैरों पे करम' या गाण्याची आठवण यावी, अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.
 
इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांच्या कारखान्याला मदतीचा हात देण्यात आला आहे. परंतु यातून पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला डावलण्यात आले. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या प्राप्तिकर माफी योजनेतही पंकजाताईंच्या कारखान्याचा समावेश नाही. शिवाय नव्या कर्जासाठी थकहमीही देण्यात आली नाही", असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडेंच्या मदतीला धावून आल्याची चर्चा आहे.
 
शरद पवारांनी पंकजा यांना केली होती मदत ?
महाविकास आघाडीच्या काळात वैद्यनाथ साखर कारखाना अडचणीत होता. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी थेट शरद पवारांना मदतीची विनंती केली होती. शरद पवारांनी मदतीची भूमिका घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं आहे.
 
सुप्रिया सुळे म्हणतात, “ शरद पवार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंकजा कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली होती. थोडक्यात भाजपाच्या निष्ठावंतांची भाजपातच वंचना सुरू असून बाहेरच्या नेत्यांची मात्र पाचही बोटे तुपात आहेत. आपल्याच कार्यकर्त्याची अवहेलना करण्याचा पॅटर्न भाजपात रुजलेला आहे".

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिक्षक भरतीसाठी तरुणाचे मंत्रालयात आंदोलन, सुरक्षा जाळीवर मारली उडी, पोलिसांनी घेतले ताब्यात