आजपर्यंत देशावरती अनेक लोकांनी आणि अनेक देशांनी आक्रमण केले; परंतु अशी परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती, असे सांगून भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की जालन्यात झालेल्या परिस्थितीवर विचारमंथन व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आल्या. त्यांचे काल (दि. 4) विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्या नाशिक मुक्कामी होत्या. यावेळी त्यांचे नाशिकमध्ये भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, पवन भगूरकर, आ. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे व ॲड. राहुल ढिकले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी रात्री नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
आज सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन दर्शन घेतले. आपल्या यात्रेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की शिवशक्ती परिक्रमे ला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, की कार्यकर्त्यांची मागणी होती आणि हा नवीन मार्ग आहे. देवाचा आणि देवाच्या भक्तीचा त्यामुळे याला तरी कोणाचा अपवाद नसावा, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, की सध्या राजकारणामध्ये कोण विरोधक आहे, हे कळतच नाही. सगळे मिळून सरकारमध्ये आहे. त्यामुळे राज्याचा विकास अधिक गतिमान होत असल्याचा दावा करून त्या म्हणाल्या, की कोणी विरोधक नसल्यामुळे धडकी भरण्याचे कारणच काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की सहिष्णुतेच्या विचारावर चालणारा हा देश आहे.
आजपर्यंत देशावर अनेक लोकांनी आक्रमण केले, तरी अशी परिस्थिती कधी उद्भवली नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, की आता चांगल्या विचारांच्या व्यक्ती राज्य करीत आहेत. त्यामुळे यावर काही ना काही तरी मार्ग निघेल आणि विचार केला जाईल, असा विश्वास व्यक्त करून मंदिरांना सुरक्षितता देण्याच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, की त्याची आवश्यकता नाही.
जालना येथील घटनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की एखादी घटना घडल्यानंतर भेट देणे हा वेगळा प्रकार आहे; परंतु घटना घडू नये, यासाठी तुम्ही काय करता, हे जास्त महत्त्वाचे आहे. आज त्यांच्या दुःखावर राजकारण करतोय, असे वाटायला नको, त्यावर इलाज व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्या पुढे म्हणाल्या, की नेते भेटून सहानुभूती देत आहेत, त्यांचे स्वागत आहे; पण त्यावर विचारमंथन होण्याचीसुद्धा आज गरज आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor