Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालाय? मग, तुमच्यासाठी ही आहे सुवर्णसंधी

mahavitran
, मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (21:09 IST)
वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना २०२२ ला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळून राज्यातील अर्थकारणाला गती मिळेल.
 
या योजनेनुसार थकबाकीची मुळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ करण्यात येत आहे. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते. योजनेचा कालावधी ०६ महिन्यांसाठी (१ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत) होता. मात्र,अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस डिसेंबर-२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.
 
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. थकबाकी एकरकमी भरण्यास इच्छूक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीज जोडणीसाठी मुळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाबाच्या वीज जोडणीसाठी मुळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. हप्तेवारीने पैसे भरण्यास इच्छूक असलेल्या ग्राहकांना पहिला हप्ता हा मुळथकबाकीच्य ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ७ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. भरावयाचा असून उर्वरीत रक्कम ठराविक हप्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.
 
ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज मंजूर केले आहेत त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपुर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास सदर ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
Edited By - Ratandeep Ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खळबळजनक! पुण्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द; RBIची कठोर कारवाई