राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात बुलडाणा जिल्ह्यातून झाली असून बुलडाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे पहिली सभा प्रचंड गर्दीमध्ये पार पडली..या सभेत उपस्थित समुदायाला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो' हा रोग मोदींसह फडणवीसांना लागलाय. त्यांनी मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लीप ऐकवून भाजप सरकार आणि त्यांच्या घोषणा व त्यांच्या मंत्र्यांचे घोटाळे लोकांसमोर मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देदीप्यमान यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील सभेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी आदी नेत्यांसह वरवट बकाल, शेगांव, संग्रामपूर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते
समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या, अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली.
हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवतंय... तुमच्या नोकर्या घालवतंय... आधारभूत किंमत देत नाहीय... कापसाला दर नाही... तांदूळ, तुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी विचारणा जनतेला करतानाच विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला चांगलेच खडसावले.
या बुलडाणा परिसरातील खारपाण पट्टयातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत होते. या दुषित पाण्यामुळे अनेक गंभीर आजार झाले होते, ही बाब लक्षात आल्यावर माझ्याकडे पाणीपुरवठा खाते असल्याने मी इथल्या १४० गावांना स्वच्छ व चांगले पाणी दिल्याची आठवण अजितदादा पवार यांनी करुन दिली.आघाडीला गालबोट लागेल असं वक्तव्य करु नका. मोडता लगेच येते परंतु जोडताना दमछाक होते त्यामुळे याचा विचार करा असे आवाहनही मा. अजितदादा पवार यांनी केले.