शेतीमालास निश्चित दर मिळावे म्हणुन मध्यप्रदेश सरकारने तेथील शेतक-यांना सोयाबीन, भुईमुग, तीळ, रामतीळ, मका, मुग, उडीद व तुर या आठ पिकांचा सर्वसाधारण भाव आणि किमान आधारभुत किंमतीतील फरकाची भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही राज्यातील शेतक-यांना दर फरकातील भरपाई द्यावी अशी मागणी लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली.लासलगाव ही देशातील आणि एशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे.
मध्यप्रदेशात गेल्या काही महिन्यांपुर्वी शेतकरी आत्महत्या आणि घसरलेल्या दरांमुळे मोठे शेतकरी आंदोलन झाले होते. त्या पार्श्वभुमीवर शेतक-यांना रास्त दर मिळावेत म्हणुन नुकतीच मध्यप्रदेश राज्य मंत्रीमंडळाने सदर आठ शेतीमालाची किमान आधारभुत किंमत व बाजारातील सर्वसाधारण भाव यातील फरकाची रक्कम शेतक-यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे.