मुंबईत आंबेडकरी जनतेचा मोठा ‘एल्गार’मोर्चा धडकला आहे. संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. भिमा-कोरेगाव प्रकरणाला अडीच महिने झाले, तरी संभाजी भिडे पोलिसांना सापडत नाहीत. सरकार संभाजी भिडेंना अटक कधी करणार? याचा खुलासा व्हायला हवा, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेतील एका चर्चेदरम्यान केली.
भिडे स्वत: पत्रकार परिषद घेतात. सरकारला धमकी देतात. असे असूनही सरकार त्यांना अटक का करत नाही? सरकारला नक्की काय हवे आहे?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
एकीकडे सरकार भिडेंना अटक करत नाही, तर दुसरीकडे मोर्चाला परवानगी दिली जात नाही. हे सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत. सरकारच्या संदिग्ध भूमिकेमुळे या साऱ्याला सरकारचा पाठिंबा आहे का? अशी शंका येते. अध्यक्षांनी सरकारला याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी केली.