Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला सवाल, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष कुणाविरोधात?

jitendra awhad
, सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (23:45 IST)
"औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना." राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले होते.त्यांच्या याच विधानावरून वाद पेटला आणि भाजप नेते त्यांच्या विरोधात उतरले.
या विधानावरून अजूनही वाद सुरूच आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराजांचे महत्त्व पटवण्यासाठी मुघलांच्या इतिहासाची आवश्यकता नाही.
 
त्यावर आव्हाड म्हणाले की 'मग छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष कुणाविरोधात? झाला हे कसं सांगणार.'
 
पण नक्की काय होतं हे प्रकरण? जाणून घेऊया.
जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात बोलताना एक विधान केले होते. "एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? "समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. 1669 साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
यानंतर भाजपने त्यांचा जोरदार विरोध केला.
 
रविवारी, 6 फेब्रुवारीला नाशिकमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने निदर्शनं करतं आव्हाड यांच्या पुतळयाला जोडे मारत त्यांचा निषेध केला.
 
जितेंद्र आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांची होती.
तर दुसरीकडे भाजपच्याच एका नेत्याने धक्कादायक विधान केलं.
 
भाजप ओबीसी मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ."
 
भाजप नेत्याच्या या विधानानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
 
जळगाव, नागपूर, पुण्यात आंदोलन
आव्हाडांच्या विधानाच्या निषेधार्थ 6 फेब्रुवारीला जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 
जळगावचे आमदार सुरेश भोळे हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे. केवळ मत मागण्यासाठी राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरतात. भविष्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशी वक्तव्यं केल्यास जोडे मारण्याशिवाय आम्हाला पर्याय राहाणार नाही," असंही ते पुढे म्हणाले.
 
जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात नागपूर, पुण्यातही निदर्शनं झाली. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणत टीका केली आहे.
 
आव्हाडांनी आपली बाजू मांडली
भाजपने जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार आघाडी उघडली असली तरी आव्हाड आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी नुकतंच एक ट्वीट करत आपली बाजू मांडली.
 
'आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा' असा हॅशटॅग देत त्यांनी एक ट्वीट केले आहे.
 
त्यात त्यांनी लिहिलं, "रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल, श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्य लढा समजावून सांगा."
 
शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी मुघलांची गरज काय?
शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा असेल, त्यांचे शौर्य सांगायचे असेल तर त्यासाठी मुघलांचा इतिहास, निजमाशाही, आदिलशाहीचा इतिहास सांगण्याची काय गरज आहे असं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले.
 
"मुघलांच्या काळात वास्तूकलेचा विकास झाला, स्थापत्यकलेचा विकास झाला हे सांगण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते," असं विनोद तावडे यांनी म्हटले.
 
"मी शिक्षणमंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकण्याबाबत विचार झाला होता," असे देखील तावडे म्हणाले.
"शिवाजी महाराज हे शूर होते हे सांगण्यासाठी मुघलांचा इतिहास का सांगावा? ते शूरच होते यात काही संशयच नाही," असे तावडे म्हणाले.
 
तावडेंच्या व्हीडिओला आव्हाड यांनी उत्तर देताना म्हटले आहे की "मला फक्त एकच प्रश्न पडला आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष कुणाविरोधात केला याचं उत्तर तुम्ही काय द्याल?"
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WPL 2023: इंग्लंडची हीअनुभवी खेळाडू बनली मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक