ध्वनिप्रदूषणप्रकरणी पक्षपाती असल्याचा आरोप करणाऱ्या राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी सोमवारी फटकारले आहे. राज्य सरकारने हायकोर्टाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असून राज्य सरकारने याप्रकरणात माफीनामा सादर करावा असे निर्देश न्या. ओक यांनी दिले आहे. राज्याच्या महाअधिवक्त्याने राज्य सरकारला शिकवू नये अशा शब्दात न्यायमूर्तींनी फटकारले.
विविध प्रकारच्या ध्वनिप्रदूषणाने नागरिक त्रस्त असतानाच ध्वनिप्रदूषण नियमांच्या अंमलबजावणीसाठी हायकोर्टाचे न्या. अभय ओक यांनी अतिशय कडक भूमिका घेतली होती. गेल्या आठवड्यात बुधवारी सुनावणीदरम्यान न्या. ओक यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारले होते. सध्याच्या घडीला राज्यात एकही शांतताक्षेत्र नाही असं म्हणत न्या. ओक यांनी नाराजी व्यक्त केली होती. नव्या निर्णयापर्यंत सध्याची शांतताक्षेत्रे कायम राहतील असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.