Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यभर गाजलेल्या रोलेट खटल्यातून कैलाश शहांची निर्दोष मुक्तता

court
, बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (21:31 IST)
नाशिक – रोलेट जुगारामुळे दोन जणांनी आत्महत्या केल्या बाबत कैलास शहा यांच्या विरोधात त्रंबक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरण हे राज्यभर गाजले होते. या दोन्ही प्रकरणात कैलास शहा यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कैलास शहा यांनी संबंधिता विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
 
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत संदिप दिलीप मेढे यांनी २०१७ मध्ये तर नामदेव रामभाऊ चव्हाण यांनी २०१९ मध्ये आत्महत्या केल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठण्यात रजि. नं. ६४/२०२१ व ११ / २०२१ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात कैलास जोगिंदरप्रसाद शहासह अन्य आरोपी करण्यात आले होते. सदर गुन्ह्याच्या तपासा वेळी या प्रकरणामुळे बरीच हळहळ व्यक्त करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास त्र्यंबकेश्वर पोलीसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करून न्यायालयात जुगार प्रतिबंधक कायदा व आत्महत्येस प्रवृत्त करणे या संदर्भात दोषारोप पत्र पाठविले.
 
नाशिक सत्र न्यायालयात दोन्ही खटल्यांचा निकाल लागला आहे. दोन्ही खटल्यांमधून संशयित आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. त्यापैकी एका खटल्यात आरोप हे खटला चालविण्याजोगे नसल्याने त्यातून आरोपींना दोषमुक्त करण्यात आले असून दुसऱ्या खटल्यात निर्दोष मुक्त केले आहे. दोन्ही खटल्याच्या तपासाच्या वेळी माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली. पोलिसांनी देखील खटला गंभीर असल्याचे चित्र तयार केले. दोन्ही खटल्यात निर्दोष मुक्तता झाल्याने पोलिसांच्या कारवाई आणि तपासाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 
सदर दोन्ही खटल्यामध्ये मयत जुगार खेळत होते असा कुठलाही पुरावा मिळाला नाही. परंतु सदर खटल्यामुळे आरोपी कैलास जोगिंदरप्रसाद शहा यांच्या कुटुंबियांची बरीच बदनामी झाली. त्यांनी फिर्यादी व त्यांना चुकीची माहिती पुरावणारे व्यक्ती यांचे विरूद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याकामी दोघांना नोटीसा दिलेल्या आहेत. या खोट्या तकारी करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कैलास शहा यांच्यावतीने ॲड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात बाजू मांडली.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परतीच्या पावसाचा तडाखा! शेतीचे नुकसान; या जिल्ह्यांना अलर्ट जारी