मुंबई –जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. मात्र या परतीच्या पावसानेदेखील जोरदार हजेरी लावली असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात सगळीकडेच पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान मध्य भारतातून मान्सूनच्या माघारी परतण्यासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून बोलले जात आहे. आज (१२ ऑक्टोबर) उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याबरोबरच हवामान विभागाने विजांसह पावसाचा काही जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाऊस असणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापुरात पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यभरात पाऊस
औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या मराठवाड्यातील भागांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर भागात पावसाचा जोर राहील, हवामान विभागाने माहिती दिली. पोषक हवामानामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे मंगळवारी उन्हाचा चटका काहीसा कमी झाला होता. उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor