Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कसबा, चिंचवड निकाल: या पोटनिवडणुकीत घडलेल्या 7 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी

result kasba chinchwad
, गुरूवार, 2 मार्च 2023 (08:46 IST)
Author,मानसी देशपांडे
कसबा आणि चिंचवड या मतदारसंघांमध्ये 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. आज (2 मार्चला) मतमोजणी होणार आहे. यामधून जनतेचा कौल कुणाला मिळाला हे स्पष्ट होईल.
 
सध्याचं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण, आगामी महापालिका निवडणुका, साधारणपणे वर्षभरात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका, राज्यातलं सत्तांतर शिंदे-फडणवीसांचं आलेले सरकार, शिवसेनेबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय, या सगळ्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका प्रकाशझोतात राहिल्या.
 
यामुळे आता विजय कुणाचा होईल याची उत्सुकता दिसून येते आहे. पण या पोटनिवडणुकांमध्ये काही गोष्टी वैशिष्ट्यपुर्णही ठरल्या. त्यांची चर्चा मतदान झाल्यावरही पुण्यात होते आहे. कोणत्या सात गोष्टी चर्चेत आहेत ते आपण बघूया.
 
1) महाविकास आघाडीचा प्रचार केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी
कसबा पोटनिवडणुकीत मनसेकडून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. कसब्यातून काँग्रेसकडून उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आधी मनसेमध्ये होते. 2009 आणि 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी कसब्यातून लढवलेली होती.
 
या पोटनिवडणुकीत मनसेचे सात कार्यकर्ते हे रविंद्र धंगेकरांचा प्रचार करताना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या सहीने काढलेल्या पत्रकानुसार या सात कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
‘कसबा पोटनिवडणुकीत सात कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना आढळून आले. गेले काही वर्ष ते पक्षात कार्यरत नाहीत. पक्षविरोधी काम करणाऱ्यांची मनसेमधून हकालपट्टी करण्यात येत आहे,’ असं त्या पत्रात नमुद केलेलं होतं.
 
2) कसब्यातील दोन्ही उमेदवारांवर आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी अदखलपात्र गुन्हे
कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या पोटनिवडणुकांच्या प्रचाराचा कालावधी 24 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता संपला.
 
पण 25 फेब्रुवारील सकाळी रविंद्र धंगेकर यांनी त्यांच्या पत्नीसोबत कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन केलं.
 
निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांच्या आंदोलन स्थळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. या आंदोलनामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार करण्यात आली होती.
 
तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी गळ्यात घातलेलं उपरणं चर्चेचा विषय ठरला. 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं.
 
त्यावेळी मतदान करण्यासाठी हेमंत रासने मतदान केंद्रावर आले तेव्हा त्यांच्या गळ्यात उपरणं होतं आणि त्यावर भाजपचं कमळ चिन्ह होतं. यामुळे त्यांच्याविरोधातही आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार दाखल झाली होती.
 
3) चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंड
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीत बंड पाहायला मिळालं. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर शिवसेनेतल (ठाकरे गट) राहुल कलाटे यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं.
 
राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी तो मागे न घेतल्यामुळे चिंचवडमधली लढत ही तिरंगी होईल असा अंदाज बांधले गेले.
 
याचसोबत राहूल कलाटेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
 
4) भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पुण्यातल्या मुक्कामाची चर्चा
कसबा आणि चिंचवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीचे बडे नेते प्रचारासाठी उतरलेले बघायला मिळाले.
 
रोड शो, सभा यांच्यासोबतच रात्रंदिवस वेगवेगळ्या घटकांसोबत बैठकांचं सत्रही पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचे नेतेही कसबा आणि चिंचवडमध्ये बैठका घेत होते.
 
याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मुक्कामाच्या चर्चा रंगल्या.
 
याचसोबत भाजपचे इतर नेतेही पुण्यात तळ ठोकून असल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं. या बाबींमुळे भाजप आणि महाविकास आघाडीकडून ताकद पणाला लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.
 
5) पुण्येश्वराच्या मुद्दा पहिल्यांदाच निवडणुकीत
प्रचार संपण्यासाठी एक दिवस बाकी असताना, भाजपकडून कसब्याच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी मुद्दा मांडला गेला. कसब्यात रोड शो दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्येश्वर मंदिराचा उल्लेख केला.
 
तसंच प्रचाराचा कालावधी संपल्यावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची पुण्येश्वर महादेवाबद्दल काय भूमिका आहे? असा प्रश्न करत त्यांच्या भाषणातला व्हिडीओसुद्धा ट्वीट केला.
 
यामुळे निवडणुकीत पहिल्यांदाच पुण्येश्वराचा उल्लेख पाहायला मिळाल्याचं निरीक्षण स्थानिक पत्रकारांनी नोंदवलं.
 
“याआधी कसब्यातून गिरिश बापट जवळपास २५ वर्ष आमदार होते. पण पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा विधानसभा किंवा अगदी महानगरपालिका निवडणुकांमध्येही कधी समोर आला नाही. या वेळेस भाजपकडून त्याचा उल्लेख करण्यात आला. कसबा मतदारसंघात सगळ्या जाती धर्मांचे लोक राहतात. यामुळे या मुद्द्याचा भाजपला कितपत फायदा होईल हे बघावं लागेल,” असं दैनिक पुढारी वर्तमानपत्राचे प्रतिनिधी पांडूरंग सांडभोर यांनी सांगितलं.
 
6) महानगरपालिका निवडणुकांची रंगीत तालीम
कसबा आणि चिंचवड हे मतदारसंघ पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये येत असल्याने विधानसभा पोटनिवडणुकांच्या निमित्ताने या मतदारसंघांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी शक्ती आजमावून पाहिल्याचं मत पत्रकारांनी व्यक्त केलं.
 
“या निवडणुकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळण्यासाठी इच्छूक असलेल्यांना स्वत: चं काम आणि ताकद पक्षापुढे सिद्ध करण्याची संधी मिळाली.
 
"काही प्रभांगांमध्ये तिथलं प्रस्थापित नेतृत्व प्रभावीपणे काम करत नसताना उदयोन्मुख नेतृत्वाने मी काम करुन दाखवतो अशी चढाओढ पाहायला मिळाली. यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांमधल्या इच्छूकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,” असं दैनिक सकाळचे प्रतिनिधी ब्रिजमोहन पाटील यांनी सांगितलं.
 
7) भाजपला घ्याव्या लागलेल्या मेहनतीची चर्चा
कसबा विधानसभा मतदारसंघ हा गेली 25 वर्षं भाजपच्या ताब्यात आहे. आधी गिरिश बापट आणि नंतर मुक्ता टिळक तिथून आमदार म्हणून निवडून आल्या. यामुळे कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे असं चित्र निर्माण झालं.
 
भाजपचे आत्ताचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रभागही कसबा मतदारसंघातच आहे.
 
असं असताना कसब्याची निवडणूक भाजपला कठीण जाते आहे का असा प्रश्न निर्माण झाला. भाजपचे वरिष्ठ नेते सातत्याने कसब्यात हजेरी लावत होते.
 
काही नेते तर मुक्कामी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कसब्यातल्या प्रचारात सहभागी झाले. काही आठवड्यांच्या आधी गृहमंत्री अमित शाह यांचा ही पुणे शहरात दौरा झाला होता.
 
आजारी असल्याने गिरिश बापट मात्र या निवडणुकीत फार सक्रीय नव्हते. ते प्रचारात एकदा दिसले. त्यावरुन भाजपला विरोधी पक्षांकडून टिका करण्यात आली.
 
काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याचे आरोप केले. याचसोबत शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचाही आरोप धंगेकरांनी केला.
 
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि आपणच जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केला.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालवणात गोवा कार्निवलच्या धर्तीवर शोभा यात्रेचे नियोजन