गोमांसावर बंदी घालण्याची प्रस्ताव मांडल्याने लक्षद्विपमध्ये वातावरण तापलं आहे. त्यासंदर्भात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून पवारांवर टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना शरद पवार कधी पत्र लिहिणार असा सवालही केला आहे.
“पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून… लॅाकडाऊनमध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता थेट लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये, यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात. महाराष्ट्रात कोकणात वादळ व अन्य भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले, पण शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहितील? मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार? १२ बलुतेदारांना मदत मिळाली नाही, त्याची विचारणा करणारे पत्र राज्य सरकारला पवार साहेब कधी लिहीणार?,” असे प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.