"माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईचे पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी घडवून आणला", असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव आहे, असंही ते म्हणाले.
आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते..
"उद्धव ठाकरे सरकारकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला. खार पोलीस स्टेशनबाहेर 70-80 लोकांचा जमाव कसा जमतो? हल्ला होईल याची कल्पना पोलिसांना दिली होती.
"पोलिसांनी वैयक्तिक जबाबदारी घेतली होती. माझ्या हल्ल्याला पोलीस कमिशनर संजय पांडे जबाबदार आहेत. पोलिसांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित आहेत. पोलीस स्टेशनच्या दारात एवढी माणसं कसे जमू शकतात. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून गाडीत बसलो. माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला", असं सोमय्या म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "खोटं एफआयआर किरीट सोमय्याच्या नावाने रजिस्टर केलं आहे. हे मॅनिप्युलेटिव्ह फेक एफआयआयआर. तुम्ही सही केली नाही तरी हेच एफआयआर असं सांगण्यात आलं आहे. ही माफियागिरी. सरकारप्रणित हल्ला आहे. पोलिसांशी हातमिळवणी झाली होती".
"केंद्र सरकारने Z सेक्युरिटी दिली आहे. कालच्या हल्ल्यात काच माझ्या हनुवटीला लागली. आणखी वर लागलं असतं तर मी आंधळा झालो असतो. राजीव कुमार चौबा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना चौकशी करायला सांगितलं आहे. भाजप शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे.
वाशिममध्येही माझ्या गाडीवर हल्ला झाला होता. कालही माझ्यावर हल्ला झाला. आतापर्यंत तीनवेळा मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्राची जनता माझ्याबरोबर आहे", असं सोमय्या म्हणाले.
"खार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. कमांडोंमुळे मी आज जिवंत आहे. खार पोलीस स्टेशनच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली. चहा प्यायलो. तुम्ही सुरक्षित जाऊ शकता असं मला सांगण्यात आलं. माझी गाडी बाहेर आली आणि 70-80 लोकांनी माझ्यावर हल्ला केला", असं सोमय्या म्हणाले.
"काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या, चप्पल फेकण्यात आल्या. दगडफेक करण्यात आली", असं सोमय्या यांनी सांगितलं.
देशद्रोहींवर दगड पडतातच-राऊत
आयएनएस विक्रांतचा घोटाळा करणारी व्यक्ती देशद्रोही आहे. या घोटाळ्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. देशद्रोही, गुन्हेगारांविषयी भाजपला एवढी तळमळ, मळमळ का? असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देशद्रोहींवर दगड पडतातच असंही ते म्हणाले.
"सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानची खाती तपासून पाहायला हवीत. केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायालय कोणाच्या आदेशाने काम करतात हे जनता बघतेय.
जात प्रमाणपत्र बनावट करून राणा यांनी निवडणूक लढवली होती. ही निवडणूक रद्द होऊ शकते. असे आरोपी एकत्र येतात. सरकारवर आरोप करतात. दोन आरोपींची युती झाली आहे.
पोलीस सक्षम आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आमच्यावर खोट्या कारवाया करतात. आमचे पोलीस खोटा कागद तयार करत नाहीत. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस खोट्या गोष्टी करत नाहीत. खोट्या गुन्ह्यात अडकवत नाहीत", असं राऊत म्हणाले.
"केंद्राकडे जाण्याआधी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा येऊन म्हणू असं राणा दाम्पत्याने म्हटलं होतं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न राणा दाम्प्त्याने केला.
शिवसैनिक आक्रमक असतो. आमच्यासाठी सत्ता काही नाही. आज असते, उद्या नाही. शिवसेना कालच्या हल्ल्याचं समर्थन करते", असं राऊत यांनी सांगितलं.
शनिवारी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी आले होते.
त्यादरम्यान, शिवसेनेच्या गुडांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलं आहे. तर सोमय्या यांनीच शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
सोमय्या यांनी याप्रकरणाची माहिती देताना ट्विट करत म्हटलं, "पोलिसांनी सीएम उद्धव ठाकरेंच्या गुंडांना पोलीस स्टेशनबाहेर जमू दिलं. मी बाहेर आल्यावर त्या गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली. गाडीच्या काचा फोडल्या. यात मी जखमी झालो असून पोलिसांच्या उपस्थितीतचं मला मारहाण केली."
"खार पोलिस स्टेशनच्या आवारात 50 पोलिसांच्या उपस्थितीत, शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे. पोलिस आयुक्त काय करत आहेत? एवढ्या माफिया सेना गुंडांना पोलीस ठाण्यात कसं जमू दिलं?," असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, "मुंबई पोलिसांनी माझी एफआयआर नोंदवण्यास नकार दिलाय. 70/80 शिवसेनेच्या गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि ठाकरे सरकारने कोणतीही कारवाई करण्यास किंवा माझा एफआयआर नोंदवण्यास नकार दिलाय."
दरम्यान, सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला नसल्याचं ही ते म्हणाले.
महाडेश्वर यांनी किरीट सोमय्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस योग्य ती कारवाई करतील - गृहमंत्री
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, "दगडफेक झाली हे खरंय पण कोणाकडून झाली का झाली हा तपासाचा भाग आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील.
"पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, त्यांना आपलं काम समजतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं."
जशाच तसे उत्तर उत्तर देण्याची क्षमता - देवेंद्र फडणवीस
याप्रकरणी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. हल्ला होणार, हे सुद्धा त्यांनी आधीच पोलिसांना सांगितले होते. असे असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही. पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे.
"या घटनेने मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालविली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात कठोर कारवाईची आमची गृहमंत्री आणि गृहसचिवांकडे मागणी आहे. आम्ही घाबरून जाऊ असे समजू नका. जशाच तसे उत्तर उत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे."