Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किरीट सोमय्यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले, सकाळी 9.30 वाजता पत्रकार परिषद

किरीट सोमय्यांना पोलिसांनी कराडमध्ये रोखले, सकाळी 9.30 वाजता पत्रकार परिषद
, सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:15 IST)
मुंबईहून कोल्हापूरला निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या हे कराडमध्ये थांबले आहेत. कोल्हापूर येथे पोहोचल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं पोलिसांनी सांगितल्यानंतर ते कराड येथे थांबले आहेत.
 
सध्या किरीट सोमय्या हे कराड येथील विश्रामगृहावर थांबले आहेत. आज सकाळी 9.30 वाजता ( 20 सप्टेंबर) ते पत्रकार परिषद घेणार आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये आज हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीतर्फे निदर्शनं होणार होती ती रद्द झाली आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अटकेची शक्यता आणि कोल्हापूर दौरा यांनी राजकीय वर्तुळात राळ उडवून दिली आहे.
 
रविवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सोमय्या रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरसाठी रवाना झाले मात्र करवीरनगरीत जाण्यापासून त्यांना पोलिसांनी रोखलं होतं.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसने सोमय्या रवाना होताना पोलिसांनी त्यांना अडवलं. तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणत कोल्हापूरला आपण जाणारचं असं त्यांनी सांगितलं.
 
यानंतर बराचवेळ सोमय्या हे पोलिसांचा गराड्यातच अडकले होते. मात्र, तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही, असं म्हणत सोमय्या रेल्वेत बसले व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.
 
"मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही, मुख्यमंत्री व शरद पवार यांचं हे कारस्थान आहे. मात्र, हसन मुश्रीफांचा घोटाळा मी उघड करणारच. चार तास मला घरात कोंडून ठेवलं याचं उत्तर मुख्यमंत्री व गृहमंत्री देणार का?," असा सवाल सोमय्या यांनी केला.
 
"कोल्हापुरात जाताच प्रथम मी अंबामातेचे दर्शन घेणार,असं सोमय्या यांनी सांगितलं होतं. मला देण्यात आलेली नोटीस पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचंही त्यांनी सांगितलं. पोलिस हे मंत्री हसन मुश्रीफ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,असं सोमय्या म्हणाले.
 
राजकीय वातावरण तापलं
किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपवली होती. विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं होतं.यानंतर आज दुपारी सोमय्या यांनी एक ट्विट केलं.
 
ते म्हणाले, "ठाकरे सरकारची दडपशाही. माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी. माझा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी, घरातून अटक करण्याचे गृहमंत्री यांचे आदेश."
या प्रकरणावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील."
तर किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते आतंकवादी आहेत का?, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला केला आहे."महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजपा घाबरणार नाही. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
 
"माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील", असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
सोमय्या यांचा कोल्हापूर दौऱ्याचा कार्यक्रम
सकाळी 7.30 आगमन. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे न्याहरी करून ते अंबामातेचं दर्शन घेणार आहेत. कागल इथल्या संताजी घोरपडे कारखान्याला ते भेट देणार आहेत. मुरगूड पोलीस स्टेशनला भेट देण्याचाही कार्यक्रम आहे. पोलीस अक्षीक्षकांशी भेट नोंदवण्यात आली आहे.दिवसभराच्या कार्यक्रमानंतर रात्री पुन्हा रेल्वेने मुंबईसाठी रवाना होणार आहेत.
 
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हातात पायताण घेऊन सोमय्या यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशन इथं उपस्थित आहेत. महालक्ष्मी एक्स्प्रेस सकाळी सव्वा सातला कोल्हापुरात दाखल होईल.
 
प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध माध्यमांतून भ्रष्टाचार आणि घोटाळे करत शेकडो कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत तब्बल 2700 पानांचे पुरावे सादर केले. विशेष म्हणजे प्राप्तीकर विभागाकडे आधीच हे पुरावे सादर केल्याचंही सोमय्या म्हणाले होते.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांचे हे आरोप फेटाळले होते.किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांनीही सोमय्या यांना बदनामीबद्दल कायदेशीर नोटीस बजावली असून 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.पण त्याला मी किंमत देत नसून सहा नेत्यांनी अशा नोटिसा दिल्या असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते.
 
माझ्या मुलाला तुरुंगात पाठविण्याचा प्रयत्न झाला, पत्नी मेधा सोमय्यांच्या मागे चौकशी लावण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांनी केला. पण मी त्याला घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत पहिलं 'मँग्रोव्ह पार्क'; गोराईमध्ये कामाला सुरुवात