Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार

eknath shinde
, बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (20:39 IST)
विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे, तरूण पिढी आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यांच्या अडचणी सोडविण्याचे शासनाचे धोरण असून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सन 2022-23 च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 108 शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्याहस्ते सहकुटुंब गौरविण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री कपिल पाटील, विक्रम काळे, किरण सरनाईक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह पुरस्कार विजेते शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2021-22 पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून हे पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने देण्यात येत आहेत. एक लाख दहा हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य शासन शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवनवीन योजना आणि उपक्रम राबवित आहे. शिक्षक हा यातील महत्त्वाचा घटक आहे. ते ज्ञानदानाचे कार्य करीत असल्याने पालकांनंतर गुरूजनांना महत्व दिले जाते. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचे शासनाचे ध्येय असून शिक्षणाचे महत्त्व जोपासण्यासाठी शासनामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवून यात अधिक योगदान देण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारचे राज्याला पाठबळ असून त्या माध्यमातून राज्यात सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणाऱ्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षण विभाग आणि शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ