कृषि सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आधार सक्षम पेमेंट सिस्टम सेवेद्वारे कोणत्याही बँकेचे पैसे डाक सेवक किंवा जवळ असलेल्या टपाल कार्यालयातून काढण्यासाठी 13 जून 2022 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे, नाशिक विभाग प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारने टपाल विभागामार्फत सुरू केलेली बँकिंग सेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना धन हस्तांतरण (मनी ट्रान्सफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस तसेच बँक खाते आधारशी जोडले असेल तर जवळच्या आधार सक्षम पेमेंट सिस्टम सेवेच्या माध्यमातून कोणत्याही बँकेचे पैसे पोस्टमन, डाक सेवक अथवा आपल्या जवळ असलेल्या टपालकार्यालय कार्यालयातून काढता येणार आहे. ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हा टपाल कार्यालयामार्फत 30 मे 2022 ते13 जून 2022 या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही लोकाभिमुख बँक आहे. या बँकेने कोरोनाकाळात शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत टपाल विभागाने घरपोच अदा केले आहे. यानुसारच कृषि सन्मान योजनेचे कोणत्याही बँकेचे पैसे पोस्ट ऑफिस मधून लाभार्थ्यांना काढता येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी नाशिक विभागातील सर्व लाभार्थ्यांनी जवळच्या टपाल कार्यालय अथवा आपल्या पोस्टमन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.