साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेले श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावर डोंगरावरील दोन मोठे दगड कोसळले. मात्र सुदैवाने मंदिरावरील बाजूने डोंगराला लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्याने मंदीरासह भाविकही सुरक्षित राहिले.
मंदिराच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन मोठे दगड संध्याकाळच्या सुमारास डोंगरमाथ्यावरून कोसळले. सुदैवाने जाळ्यांमध्ये हे दगड अडकले व जाळ्यादेखील दगडांच्या वजनाने तुटल्या नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा दगड मंदिरावर कोसळण्याचा धोका होता. अंदाजे एक दगड पाचशे ते सहाशे किलो वजनाचा आहे. दरड कोसळल्याने मोठा आवाज झाला व एकच गोंधळ उडून धावपळ झाली. भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली. सर्वांनी धाव घेत मंदिराच्या बाहेर येऊन डोंगरावर नजर टाकली असता जाळ्यांमध्ये दोन दगड अडक ल्याचे दिसले.