नागपूर शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली.
नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत परिस्थितीची माहिती देत सांगितले की नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरता येणार नाही. या दरम्यान कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहे. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
लॉकडाउनमध्ये खासगी कार्यालयं बंद राहतील तसेच शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. तसेच खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहतील.
लॉकडाउनमध्ये मद्यविक्री दुकान बंद राहतील. ऑनलाइन मद्यविक्री सुरु राहील तसेच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील. या दरम्यान लसीकरण सुरु ठेवलं जाणार असून १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.
लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहणार, असं नितीन राऊत यांनी सांगितलं. काळजी म्हणून घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी दोषी आढळल्यास कारवाई केला जाईल, असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.