राज्यातील राजकीय अस्थिरता संपलेली नाही. त्यातच शिवसेना आणि मनसे युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूवीवर मनसेप्रमुखराज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकी दरम्यान राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पाहा, अशी महत्त्वपूर्ण सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिक आणि मनसे पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवण्याचा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, ही बैठक आटोपल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नांदगावकर यांना मनसे आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत विचारले असता याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेच काय ते स्पष्ट करतील, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्या राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.