कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी दिला जात नाही, मदत केली जात नाही अशा आशयाचे दावे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारकडूवन केले जात होते. या दाव्यांना आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘केंद्र सरकारकडून विविध योजना आणि जीडीपीवरचं कर्ज अशा राज्याला मिळणाऱ्या आणि मिळू शकणाऱ्या निधींची बेरीज केली, तर ही रक्कम तब्बल २ लाख ७० हजार कोटींच्या घरात जाते. पण आता राज्य सरकारला बोल्ड निर्णय घ्यावे लागतील. पण फक्त खोटा प्रचार करून सरकारची प्रतिमा मलीन केली जात आहे’, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळत असलेला आणि मिळू शकणारा निधी यांची सविस्तर आकडेवारी सांगितली. ‘केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना आणि स्थलांतरीत मजुरांना देण्यात येणारं अन्नधान्य यासाठी केंद्र सरकारकडून एकूण ४ हजार ५९२ कोटी दिले जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत १७२६ कोटी केंद्र सरकारने दिले आहेत. मजुरांना स्थलांतर करण्यासाठीच्या रेल्वेंसाठी ३०० कोटी आणि लेबर कॅम्पसाठी १६११ कोटी रुपये देण्यात आले आहेत. आरोग्य सुविधा आणि साधनसामग्री यावर २०५९ कोटी रुपये देण्यात आले. जीएसटी परतावा आणि इतर कर परताव्याच्या रुपात केंद्र सरकारने राज्याचा ११४८ कोटींचा हिस्सा असताना ५ हजार ९४८ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय शेतीविषय धान्य खरेदीसाठी ९ हजार ६९ कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत विविध बाबींसाठी देण्यात आलेल्या या निधीची बेरीज तब्बल २८ हजार १०४ कोटींच्या घरात जाते’, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.