Publish Date: Fri, 30 Oct 2020 (08:30 IST)
Updated Date: Fri, 30 Oct 2020 (08:33 IST)
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली, तरी आजाराचं संकट मात्र कायम आहे. पुढील काही दिवसांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीनं व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, मिशन बिगिन अगेनतंर्गत सुरू केलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
राज्यात मार्चमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत असल्यानं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिने लॉकडाउन कायम ठेवल्यानंतर एक एक सेवा पूर्ववत सुरू केली जात आहे. यासाठी राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेन (पुनश्च हरिओम) कार्यक्रम जाहीर करत टप्प्याटप्प्यानं सेवा सुरू करण्याच्या दिशेनं पावलं टाकली. राज्यातील अनेक सेवा व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले, तरी कंटेनमेंट झोन व कोरोना उद्रेक झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे.