राज्यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विदर्भातील विधान परिषदेच्या नागपूर, अकोला-वाशीम-बुलढाणा स्थानिक संस्था मतदार संघामध्ये भाजपने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला, तर अकोला-वाशीम-बुलढाणा स्थानिक संस्था मतदार संघामध्ये भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. विधान परिषदेच्या ६ जागांपैकी ४ जागा यापूर्वीच बिनविरोध नि
वडून आल्या आहेत. ६ पैकी ४ जागा भाजपला, तर शिवसेना, काँग्रेसला प्रयेकी एक जागा मिळाली आहे. मुंबईतून शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंस सिंह, कोल्हापुरातून काँग्रेसचे सतेज पाटील, तर नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल बिनविरोध निवडून आले आहेत.
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक संस्था मतदार संघामध्ये एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली, काँग्रेसने पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली होती. दोन वर्षांच्या राजकीय विजयनावासानंतर भाजापाने आता नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने आधी छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती. तर नंतर ऐनवेळी उमेदवार बदलून मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्याचा काँग्रेसला फायदा मिळाला नाही.
या मतदानासाठी भाजपाकडे ३१८ मते होती. मात्र बावनकुळे यांना प्रत्यक्षात ३६२ मते मिळाली. भाजपा उमेदवार बावनकुळेंना त्यांच्याकडे असलेल्या मतांच्या कोट्यापेक्षा तब्बला ४४ मते अधिक मते मिळातील. म्हणजेच महाविकास आघाडीची ४४ मते फोडण्यात भाजपला यश आले. तर मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.
दरम्यान, या विजयानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत. मला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानतो. काँग्रेसचा आज झालेला पराभव हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.