Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र ओमिक्रॉन कोरोना निर्बंध: आजपासून नवे निर्बंध, रात्री जमावबंदीची घोषणा

महाराष्ट्र ओमिक्रॉन कोरोना निर्बंध: आजपासून नवे निर्बंध, रात्री जमावबंदीची घोषणा
, शनिवार, 25 डिसेंबर 2021 (08:38 IST)
राज्यातील वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू होतील.
विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील 110 देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे.
 
या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
 
राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
आज 24 डिसेंबर 2021 रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील.
 संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.
लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
 इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
 उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
 क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 20 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
23 डिसेंबरच्या बैठकीत काय झालं होतं?
भारतात ओमिक्रॉनमुळे संभाव्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोव्हिड टास्कफोर्सच्या तज्ज्ञांशी चर्चा केली.
 
मुंबईत 20 डिसेंबरला 200 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली होती. 23 डिसेंबरपर्यंत का आकडा वाढून 600 वर पोहोचलाय.
तर महाराष्ट्रातही 48 दिवसांनंतर हजारावर नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
नवीन वर्ष, ख्रिसमस आणि सुट्टी यामुळे कोरोनासंसर्ग मोठ्याप्रमाणावर पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने काही निर्बंध घालण्याचा विचार सुरू केलाय.
 
टास्कफोर्सचे सदस्य सांगतात, "सद्यस्थितीत सर्व बंद करण्याची गरज नाही. आपल्याकडे ओमिक्रॉनचे रुग्ण कमी आहेत. पण अर्थव्यवस्थेला चालना देताना गर्दी करून चालणार नाही. त्यावर लक्ष दिलं पाहिजे."
 
काही दिवसांपूर्वी मुंबईत एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये कोरोना प्रोटोकॅाल धाब्यावर बसवून पार्टी आयोजित करण्यात आली होती.
 
केंद्राने कोरोना संसर्ग पसरण्याची भीती पहाता राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याची सूचना केली होती.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कोरोना संकटावर गांभीर्याने विचार केला जातोय. पंतप्रधान यावर लक्ष ठेऊन आहेत. रात्री लॅाकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळींवर सुरू झालीये."
 
एकीकडे सरकार निर्बंध घालण्याची तयार करतंय. तर मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी निर्बंध घालते आहेत.
 
मुंबईतील निर्बंध
200 पेक्षा जास्त लोक हॅाटेल किंवा कोणत्या ठिकाणी एकत्र येणार असतील तर सहाय्यक आयुक्तांची परवानगी आवश्यक
बंद ठिकाणी पार्टी, लग्न, गेटटूगेदर, कार्यक्रम यासाठी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी
मोकळ्या जागेत या कार्यक्रमांसाठी जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोक
मुंबईत नवीन वर्ष आणि सुट्टीचे दिवस असल्याने गर्दी होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केलंय.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, "कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही."
 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात आजपासून हे 4 निर्बंध लागू