यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचं नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळाला केले आहे. आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मंत्रालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल.
ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही, याची काळजी आपण घेऊ पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू, यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू, असे ही मुख्यमंत्री म्हणाले.