मुंबईसह राज्यभरात ऑक्टोबर हिटची जाणीव होत असून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याच्या अनेक भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच, बुधवारी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील काही तासांत मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, परभणी, नांदेड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. मागील आठवड्यात राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. याशिवाय, येत्या 2 ते 3 दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता आहे. विजांसह पावसाचा येलो अलर्ट धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या भागात देण्यात आला आहे.