Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मविआची भूमिका जाहीर! सत्यजित तांबे अन शुभांगी पाटील यांचा फैसला झाला..

मविआची भूमिका जाहीर! सत्यजित तांबे अन शुभांगी पाटील यांचा फैसला झाला..
, गुरूवार, 19 जानेवारी 2023 (21:40 IST)
राज्यभरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी लागली त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा नव्याने फुलले. यात नाशिकसह इतर ठिकाणी अधिकृत उमेदवारांनीच बंड पुकारले, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. त्यात आता मविआने पत्रकार परिषद घेत या निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी कडून जितेंद्र आव्हाड यांनी मविआची भूमिका स्पष्ट केली आहे.
 
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिकची जागा ही बहुचर्चित ठरतेय कारण इथे कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांच्या जागी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनीच ऐनवेळी निवडणुकीत अर्ज भरल्याने कॉंग्रेसची नामुष्की झाली. त्यामुळे त्यावर काँग्रेस काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
 
बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांचे अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत उमेदवारच या निवडणुकीत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.
 
तसेच यावेळी नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि कोकण विभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.
 
मविआने आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यात त्यांच्या पाठिंब्याचे उमेदवार कोण असणार आहेत यावर देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली असून राज्यातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या निवडणुकांत आता सरळ सामने रंगणार आहेत. त्यात सर्वांचे लक्ष विशेषतः नाशिक पदवीधरकडे लागली असून मविआच्या पाठींब्याने शुभांगी पाटील यांना मोठे बळ मिळाले आहे. त्यामुळे आता तांबे आणि पाटील असा थेट अटीतटीचा सामना रंगणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सप्तश्रृंगी देवी मंदिराचे होणार नूतनीकरण