औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते गो – लाईव्ह कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक १० जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह येथे काढण्यात येणार आहे.
याप्रसंगी श्री. डिग्गीकर यांच्या हस्ते सोडतीची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली , मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन औरंगाबाद मंडळातर्फे करण्यात आले आहे.
दिनांक २६ एप्रिलपासून सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराला अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. अर्ज नोंदणीची प्रक्रिया दिनांक २४ मे, २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २५ मे, २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत आहे. अनामत रकमेच्या ऑनलाईन स्विकृती करिता दिनांक २६ मे, २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत असून बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा दिनांक २७ मे, २०२२ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक २ जून, २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)
औरंगाबाद मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३३८ सदनिका आहेत. यामध्ये लातूर एमआयडीसी येथे ३१४ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे १८ सदनिका, औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथे ६ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
म्हाडा गृहनिर्माण योजना
म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे २७ भूखंड व २ सदनिका, अंबड (जि. जालना) येथे ६ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे ३८ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) सोडतीत भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, हिंगोली येथे १६ सदनिका, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे ५३ भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ ४ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे १९ भूखंड सोडतीत उपलब्ध आहेत.
सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, कन्नड (जि. औरंगाबाद) येथे ६ सदनिका, हिंगोली येथे ३५ सदनिका, परभणीतील गंगाखेड रोड येथे २५ सदनिका व ३४ भूखंड, उस्मानाबाद एमआयडीसी एरिया येथे ५ सदनिका, चिखलठाणा (औरंगाबाद) येथे ३९० सदनिका, सेलू (जि. परभणी) येथे २ भूखंड, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे १ गाळा, नवीन कौठा (जि. नांदेड) येथे १ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे ५९ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी (High Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे ७ भूखंड, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे १ भूखंड, बन्सीलाल नगर येथे १ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून या गटासाठी पैठण (जि. औरंगाबाद) येथे २१ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे ३९ सदनिका उपलब्ध आहेत.
२० टक्के सर्वसमावेशक योजना
२० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी काळे इस्टेट, इटखेडा, ता. जि. औरंगाबाद येथे ३१ सदनिका तर देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २३ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. औरंगाबाद मंडळाच्या या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी दि. ०१/०४/२०२१ ते दि. ३१/०३/२०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपये पर्यंत असावे.
अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५,००१ हजार रुपये ते ५० हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ५०,००१ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत ५ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटाकरीता १० हजार रुपये, तर मध्यम उत्पन्न गटातील अर्जदाराला १५ हजार रुपये, उच्च उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत २० हजार रुपये व सर्व उत्पन्न गटातील अर्जदाराला १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर सर्व अर्जदारांच्या अनामत रकमेचा त्यांच्या खात्यामध्ये परतावा केला जाणार आहे. तसेच या सोडतीकरिता रु. ५९० रुपये प्रति अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
औरंगाबाद मंडळाच्या सोडतीत सहभाग घेणाऱ्या इच्छूक अर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडे पारदर्शक संगणकीय सोडतीची एकमेव प्रक्रिया आहे याव्यतिरिक्त म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. सोडत प्रक्रियेबाबत अथवा सदनिका मिळणेबाबत अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास औरंगाबाद मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे. सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्याकरिता आणि संगणकीय सोडत प्रणालीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याकरिता सन २००९ पासून उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे. कोंकण मंडळाच्या २०२१ च्या सोडतीसाठी देखील त्रिसदस्यीय उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.