नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बँड पथकातील जवानांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मूळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळवण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते.
महाराष्ट्र सदन येथे आज सकाळी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजिमेंटचे बँड पथक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पथकातील जवान सदनाच्या उपहारगृहातील एक्झिक्युटिव्ह डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी गेले. त्यावेळी सदनचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना तिथे बसण्यास विरोध केला. जवानांना बाहेरच्या सार्वजनिक डायनिंग हॉलमध्ये बसण्यास सांगितले आणि त्यांच्याशी हुज्जत घातली.