राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे.
राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची पुर्नरचना करण्याबाबतची कार्यवाही यापूर्वी करण्यात आली होती मात्र या कार्यवाहीला लागणारा कालावधी लक्षात घेता सन २०१८ मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहिरनाम्यास स्थगिती देण्यात आली होती ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे त्यामुळे शहरी भागातही आता स्वस्त भाव धान्य दुकाने सुरू होणार आहेत.
सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने महाराष्ट्र राज्यात गरीब व गरजू लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शहरी भागातील अशी लोकसंख्या अधिक आहे.तसेच कोरोना या आजाराची तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत रास्तभाव दुकानांमार्फत राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य तसेच केरोसिन वाटपाचे महत्त्वपूर्ण कार्य चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.तसेच राज्यात जुलै व ऑगस्ट पावसामुळे अनेक शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीत तेथे सरकारी मदत अन्नधान्याच्या स्वरूपात रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून देणे अनिवार्य असून शहराची मुळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ही शासनाची जबाबदारी ठरते अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.