Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 5 March 2025
webdunia

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे घ्यावी – मंत्री धनंजय मुंडे

dhananjay munde
, गुरूवार, 20 जुलै 2023 (07:44 IST)
मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासह या भागातील नागरिकांच्या विविध समस्या आहेत. मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्यासाठी औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घ्यावी आणि विकासाच्या दृष्टीने व्यापक निर्णय घेण्यात यावेत, अशी अपेक्षा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत व्यक्त केली.
 
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसेनानींना व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडला त्या प्रस्तावावर कृषी मंत्री श्री.मुंडे बोलत होते.
 
मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास मराठवाड्यासह देशाला माहित व्हावा, या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी या दृष्टीने यंदाचा अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मराठवाड्यात निमंत्रित करावे, अशी विनंती कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे यावेळी केली.
 
निजामाच्या राजवटीत झालेले अत्याचार व त्याविरुद्ध मराठवाड्याने दिलेला निकराचा लढा यामध्ये मराठवाड्यातील संत परंपरा, लढाऊ वृत्ती, ज्ञान, संस्कृती यांनी झालेली पायाभरणी, त्याचबरोबर मराठवाड्याला सुरुवातीपासून असलेला संघर्षाचा वारसा याचीही  आठवण  करून देऊन स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व केलेले स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, भाऊसाहेब वैशंपायन, रवी नारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या हुतात्म्यांचे स्मरण करून स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटचालीतील योगदान दिलेल्या शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे यांचे संस्मरण करत त्यांनाही अभिवादन केले.
 
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवून साजरा करण्यात आला. त्याच धर्तीवर यंदा 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सुद्धा ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवून साजरा करावा. अशी विनंतीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना केली.
 
देव धानोरा येथे शहिदांचे स्मारक उभारलेले आहे, मात्र, आता त्याची दुरवस्था झाली असून, राज्य शासनाने मराठवाडा मुक्तीसंग्रामचा अमृत महोत्सवी विशेष कार्यक्रम यावर्षी घोषित केला आहे. त्यातून या स्मारकांची नव्याने उभारणी करण्यात यावी, असे सांगून श्री. मुंडे यांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर प्रकाश टाकताना आजोळच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील काही आठवणी सांगितल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Schools is closed ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना गुरुवार २० जुलैला सुटी