Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – राजेश टोपे

युवकांच्या लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य अभियान’ २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राबविणार – राजेश टोपे
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (08:22 IST)
राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. युवकांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष उभारण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.
 
 टोपे म्हणाले, लस आणि लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन केले जात आहे.
 
राज्यात उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सुमारे पाच हजार संस्था आहेत. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठे अशा सर्व संस्थात मिळून सुमारे चाळीस लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना या अभियानाच्या कालावधीत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
दरम्यान, या अभियानाच्या नियोजनाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व्हिसीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत मिशन युवा स्वास्थ्यची अमंलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
 
आरोग्यमंत्री  टोपे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण कर्मचारी आणि लस उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सावंत यांनी महाविद्यालयात कक्ष उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांची माहिती प्राचार्याकडून संकलित केली जाईल, असे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक: तेरा वर्षाच्या मुलाकडून चार वर्षीय बालिकेवर अत्याचार