अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग आणि राणा दाम्पत्यामध्ये वाद वाढत चालला आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काही संघटनांनी केली आहे.
या सर्व घडामोडीनंतर अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरती सिंग अमरावतीच्या पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांना कंटाळून चार पोलिसांनी आत्महत्या केली आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत हे आरोप केले आहेत.
संबंधित व्हिडीओत रवी राणा म्हणाले की, सध्या काही संघटना पोलिसांवर प्रेम दाखवत आहेत. आरती सिंग यांच्या सांगण्यावरून या संघटनांचं पोलिसांवरील प्रेम उतू चाललं आहे. त्यांना माझा एकच सवाल आहे की, अमरावतीमध्ये आरती सिंग पोलीस आयुक्त झाल्यानंतर चार पोलिसांनी आत्महत्या केली. त्यांनी आरती सिंग यांना कंटाळून आत्महत्या केली, त्यांचं कुटुंब न्याय मागत होतं. पण आरती सिंग त्यांना कधीही भेटायला गेल्या नाहीत. पण खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात काही मूठभर लोकांना समोर आणून त्यांना कॅबिनमध्ये बसवणे, त्यांचं ऐकून घेणे, त्यांचं निवेदन स्वीकारणे, हे सर्व आरती सिंग करत आहेत. गेल्या दोन वर्षात अमरावती शहराचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमरावतीत दंगे झाले, पोलिसांना धक्काबुक्की झाली, त्यावेळी या मूठभर संघटना पुढे का आल्या नाहीत? असा सवाल रवी राणा यांनी विचारला आहे.