भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युतीच्या जागा वाटपबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून भाजप-शिंदे गटात नव्या वादाला तोंड फुटताना पाहायला मिळतंय.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत असून, आमदार संजय शिरसाटांनी बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे.
“फक्त 48 जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का?” असा प्रश्न शिरसाटांनी बावनकुळेंना विचारलं. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
संजय शिरसाट म्हणाले, “बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही. बावनकुळे यांना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. कोणी दिले त्यांना अधिकार? अशाप्रकारे वक्तव्य केल्याने युतीमध्ये बेबनाव येते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.”
“आम्ही काही मूर्ख आहोत का? फक्त 48 जागा लढवण्यासाठी, याच्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल आणि तिथे काय तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे त्यांना तो निर्णय जाहीर करु द्यावा. बावनकुळे यांना अधिकार कोणी दिला आहे? अशामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होत असते. बावनकुळे यांनी अतिउत्साहाच्या भरात असे विधान केले आहे. त्यांना वाटत आहे की, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझ्या नेतृत्वाखाली जास्त जागा यायला पाहिजे. पण आपल्या अशा वक्तव्यामुळे सहकारी पक्षाला त्रास होतो. त्यामुळे आपल्या अधिकारात जेवढे आहे तेवढच बोलले पाहिजे,” असंही शिरसाट म्हणाले.
Published By- Priya Dixit