पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे मनसेला एक धक्का बसला आहे. त्यातच आता मनसेच्या एका नेत्याने शिवसेना नेत्यांची भेट घेतली आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची गुप्त भेट घेतली आहे. यावेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई देखील उपस्थित असल्याची माहीती मिळत आहे. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता रुपाली पाटील यांच्या पाठोपाठ अभिजीत पानसे ही मनसेला जय महाराष्ट्र करणार का..? असा सवाल उपस्थित होत आहे. अभिजीत पानसे हे उदय सामंत यांना भेटले आणि त्यावेळी वरूण सरदेसाई सुद्धा उपस्थित होते. या भेटी दरम्यानचा एक फोटोही समोर आला आहे.
अभिजित पानसे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याने चर्चांणा उधाण आले आहे. या भेटीवर उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, अभिजीत पानसे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी आले होते. राजकीय चर्चा झालेली नाही.
भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा जरी उदय सामंत यांनी केला असला तरी राजकारणात कधी काय होईल याचा कुणीही अंदाज वर्तवू शकत नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्षांत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.