रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हातातून मोबाईल खेचून दुचाकीवरून पसार होणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे. भारत राठोड (वय 19), देवानंद जाधव (वय 19), दीपक राठोड (वय 19),वैभव जगताप (वय 24) अशी आरोपींची नावे आहे.
त्यांच्या चौकशीत नवी मुंबई परिसरातील मोबाईलच्या चोरीचे 17 गुन्हे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने त्यांच्याकडून 5 लाख दोन हजार 700 रुपये किमतीचे 29 मोबाईल फोन हस्तगत केले.
आरोपी पनवेल व कळंबोलीतील रहिवासी आहे. लुटारू मोबाईल फोनवर बोलत पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातील मोबाइल खेचून दुचाकीवरून पोबारा करत. या टोळीने तळोजा, कळंबोली, कामोठे, पनवेल या भागांत हैदोस घातला होता. त्यामुळे अखेर पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त अमित काळे यांच्या आदेशावरून गुन्ह्याचा तपास सुरू होता.
अखेर गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनील गिरी यांच्या पथकाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त करून सर्व घटनास्थळी तांत्रिक तपास करत आरोपीबाबत माहिती संकलित केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळवून त्यांना अटक केली.
Edited By- Ratnadeep Ranshoor