राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणांवर टीका केली आहे.मोदींना केवळ संघाच्या शाखेत शिकवलं जातं तेवढाच इतिहास माहिती आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच मोदींनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होऊ नये, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या २ दिवसंपासून संसदेत ज्या भाषेत आणि जशा देहबोलीत बोलत आहेत, ते अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा भाषेत अशा देहबोलीसह बोलणं शोभत नाही. या देशाला इतिहास आहे. हा इतिहास तोडण्याची मोडण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदींना संघाच्या शाखेत जे शिकवलं जातं तेवढाच इतिहास माहिती आहे. त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं कुलगुरू होऊ नये.”
या देशाचा एक इतिहास आहे आणि संसदेची एक गरीमा आहे. त्यांनी ते सगळं सांभाळावं. जे काही वाईट झालं ते काँग्रेसमुळे झालं आणि जे काही चांगलं झालं ते फक्त मागील ७ वर्षातच झालं असं ते सांगत आहेत. पीएसयू मागील ७ वर्षात विकले गेले, पण त्याआधी ते निर्माण करण्यात आले. त्याबद्दल मोदींना काहीही चांगुलपणा नाही. पंतप्रधान मोदी जे जे बोलत आहेत ते द्वेषापोटी बोलत आहेत. त्यांच्या देहबोलीतून हे दिसून येतं. ते अत्यंत नैराश्यात गेले आहेत,” असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.