राहुल गांधी यांनी देशातील विविध राज्यात भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेद्वारे ते केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. ही यात्रा दिवाळीनंतर महाराष्ट्रात येणार आहे. या 'भारत जोडो यात्रे'त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्यांनी आज काँग्रेसचे निमंत्रण स्वीकारले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली.
काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी सुरू केलेली 'भारत जोडो यात्रा' नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.
Edited By- Ratnadeep Ranshoor