राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकतात. तत्पूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत आणीबाणीचा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळाला.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. राज्यात एकप्रकारे अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे. राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्याला तुरुंगात टाकले जात असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांच्या या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर देशात काय घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणं ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा खोचक प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी विचारला.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.
या हिवाळी अधिवेशनात 10 विधेयकं आणि 6 अध्यादेश येणार आहेत. त्याचबरोबर आज शोक प्रस्ताव, पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी बनवण्यात आलेलं शक्ती विधेयकही विधिमंडळात मांडले जाण्याची शक्यता आहे.