राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते नारायण राणे यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढणार हे अद्याप जाहीर केलेले नसले तरी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर याचा निर्णय घेऊ, अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार राणे यांनी दिली. कणकवलीतल्या पडवे येथील लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीतही पाच राज्यांच्या निकालाप्रमाणेच धक्का बसेल, असे राणे म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी भाजप नेते प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना राजकारण कळत नाही. ते राजकारणात अजून लहान आहेत. माझा पक्ष एनडीएचा घटक पक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कर्तृत्वशून्य आहेत. पालकमंत्र्यांना निधी कसा खर्च करायचा हेसुद्धा माहीत नाही. जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला पालकमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोपही राणेंनी केला आहे.