Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक : विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे ध्येय-दिपक केसरकर

deepak-mhaiskar
, सोमवार, 31 जुलै 2023 (08:44 IST)
प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधांसाठी शासन कटीबद्ध आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक धोरण ठरविण्यात येणार असल्याची ग्वाही, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा क्रीडा विभाग मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक विभाग नाशिक येथे राज्याचे शिक्षण मंत्री तथा क्रीडा विभाग मंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली.
 
 केसरकर पुढे म्हणाले की, मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांना मोफत गणवेश, पुस्तके, वह्या व इतर सुविधा शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक संस्थांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी टप्पा अनुदान जाहिर करण्यात आले. परंतु या अनुदानातून फक्त २५ ते ३० टक्केच नवीन शाळांना मान्यता देण्यात आल्यामुळे यासाठी काही अटी, शर्ती शिथिल करुन जास्तीत जास्त शैक्षणिक संस्थाना न्याय देण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु आहे. तसेच विशेष मोहिम राबवून जवळपास ६१ हजार शिक्षकांना न्याय देण्यात आला आहे.
 
विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी करणार
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण आनंदाने घेता यावे यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने दफ्तराचे ओझे कमी करण्यावर भर देण्यात येणार असून एकाच पुस्तकातून सगळे विषय शिकविण्याबाबतचा प्रयोग महाराष्ट्रात राबवायचा असून यामध्ये शिक्षण विभागाने लक्ष घालावे, अशा सूचनाही केसरकर यांनी दिल्या.
 
शिक्षक भरतीसाठी रोस्टर अद्ययावत ठेवावे
शालेय प्रश्न सोडवत असतांना टप्पा अनुदानात शाळांना सहभागी करुन घेण्याबरोबर शिक्षकांची मोठी भरती सुरु करण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३० हजार व दुसऱ्या टप्यात २० हजार शिक्षकांची भरती सुरु केली. ही भरती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदांचे रोस्टर परिपूर्ण करावे. त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शाळांनी व संस्थानी शालेय रेकॉर्ड व रोस्टर अद्यावत ठेवावे, जेणेकरुन पुढील काळात भरती प्रक्रीया जलद गतीने राबविण्यात येईल. तसेच जोपर्यंत नवीन भरती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेवून विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले. यावेळी केसरकर यांनी बैठकीस उपस्थित विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
भिडे मला भेटल्यास मी त्यांच्याशी चर्चा करेन
संभाजी भिडे मला भेटल्यास मी त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांना सांगेन की आपले जे काम सुरू आहे, तेच चागंल्या प्रकारे करीत रहावे, अनावश्यक वक्तव्ये करण्याचे टाळावे असे सांगितले.
 
केसरकर म्हणाले की, संभाजी भिडे जी भाष्ये करतात, तो सर्व वयोमानाचा परिणाम असावा. आता त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचा विचार करताना हा मुद्दा देखील विचार करावा. वयोमानाचा मुद्दा हा देखील विचारात घेतलाच पाहिजे. भिडे गड, किल्ल्यांबाबत काम करतात. त्यांनी त्या क्षेत्रात काम करीत रहावे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र: जयपूर-मुंबई चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार, 4 प्रवासी ठार