Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक : मेहुणीच्या प्रेमप्रकरणातून धाकल्या साडूला संपवलं, मोठा साडू फरार

crime
, बुधवार, 17 मे 2023 (08:45 IST)
अविवाहित मेहुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या वादात धाकटा साडू बाजू घेत नसल्याचा राग मनात ठेवून थोरल्या साडूने भाऊ आणि सहकाऱ्यांच्या मदतीने धाकल्या साडूस लोखंडी रॉड आणि दांडक्याने मारहाण केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. चौघांविरोधात घोटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून घटनेनंतर संशयित फरार झाले आहेत.
 
नाशिक शहरासह जिल्ह्यात सातत्याने किरकोळ कारणावरून खुनाच्या घटना समोर येत आहेत. अशातच घोटी येथे लग्न सोहळ्यासाठी संदीप शांताराम निकाळे व अनिकेत शिंदे हे दोघे सख्खे साडू कुटुंबीयांसह आले होते. या दोघांमध्ये अविवाहित मेहुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणावरून वाद धुमसत होता. संदीप निकाळे हा धाकट्या मेहुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून पत्नीसारखे वागवत असल्याने धाकटा साडू अनिकेत शिंदे यास खटकत होते.
 
त्यामुळे ‘तू माझी बाजू न घेता सासूरवाडीची बाजू घेतो’, या कारणातून या दोन्हीमध्ये वाद सुरू होता. त्याचे रुपांतर शनिवारी मध्यरात्री हाणामारीत झाले. अनिकेत शिंदे यास संदीप निकाळे आणि त्याच्या तिघा सहकाऱ्यांनी मारहाण केल्याने अनिकेतचा मृत्यू झाला. घोटी पोलिसांनी मेहुणा गणेश देविदास जगताप याच्या फिर्यादीवरून संदीप शांताराम निकाळे, विशाल शांताराम निकाळे, सागर सोनवणे, अमोल पवार यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून चारही संशयित फरार झाले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत नातेवाईकाच्या लग्नासाठी इगतपुरीतील रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. तो लग्नसोहळा आटोपून पुन्हा शिंदे टिटवाळा येथे जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याचा मोठा साडू संदीप निकाळ याने अनिकेतजवळ आला. ‘तू माझी बाजू घेत नाही, माझ्या सासरची बाजू का घेतो’, असे म्हणत त्याने अनिकेतशी वाद घातला. त्याने मद्यधुंद अवस्थेत रविवारी मध्यरात्री सोबत आलेल्या विशाल शांताराम निकाळे, सागर सोनवणे, अमोल पवार यांना बोलवून घेतले. त्यावेळी त्याने साडू अनिकेतचा खून करायचे आहे, असे तिघांना सांगितले. त्यानुसार संशयितांनी अनिकेतला मोबाईल कॉल करून घोटी सिन्नर फाटा परिसरात बोलावून घेतले.
 
घटनेनंतर चारही संशयित फरार:
‘सुरूवातीला सासरची बाजू का घेतो, माझी बाजू का घेत नाही’ असे म्हणत मोठा साडू संदीप निकाळे याच्या संशयितांनी त्यास लाकडी दांडे, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो बेशुद्ध अवस्थेत दिसताच सर्वांनी त्याला रोडच्या बाजूला टाकून पळ काढला.

ही बाब नातेवाईकांना समजताच त्याचे मेहुणे गणेश जगताप व सहकाऱ्यांनी अनिकेतला उपचारार्थ घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मयत घोषित केले. त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत हंबरडा फोडला. याप्रकरणी गणेश देवीदास जगताप यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करत आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१२ वर्ष रखडलेल्या कोकण रेल्वे विभाग टर्मिनसच काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अटळ !