नाशिक : नाशिककरांनो अडीनडीला कधीही फोन करा, शिंदे गटाचे संपर्क कार्यालय तुमच्यासाठी सदैव खुले राहील, त्यामुळे बिनदिक्कतपणे आपल्या समस्या, तक्रारी आमच्यापर्यंत घेऊन या, असे आवाहन शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले.
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन पक्षाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत.
एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलं.
तसेच राज्यातही अनेक ठिकाणी शाखा तसेच संपर्क कार्यालय उभारणीचं काम सुरु आहे. मात्र नाशिकमधील कार्यालयचं आज उदघाट्न झालं आहे. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक कार्यालय हे भव्य नाव असलेलं असं कार्यालय आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या जवळ खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच उभं करण्यात आलेल आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर शालिमार परीसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे.
आज (दि. २१ ऑक्टोबर २०२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांचं शिंदे गटाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. नाशिकच्या शालिमार परिसरात उभारण्यात आलेल्या या शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईनंतर राज्यातील हे दुसरे महत्वाचे संपर्क कार्यालय म्हणून ओळखले जाईल, शिवाय अडीनडीला कधी फोन करा, नाशिकरांसाठी शिंदे गटाचे हे कार्यालय कधीही खुलं राहील, असं उदघाटनाच्यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान या प्रवेशद्वारावरच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि वाघाचे चित्र लावण्यात आलेले आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं आणि शिंदे गटाचं हे पहिलं संपर्क कार्यालय आहे, ज्याची बांधणी नाशिक मध्ये झाली आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor