मागील काही दिवसांपासून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार याबद्दल जोरदार चर्चा सुरु होत्या. मात्र अनेकदा राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देऊनही विलिनीकरणाबाबत चर्चा थांबल्या नाहीत. तर राष्ट्र्वादीच अस्तित्व स्वतंत्र ठेऊन आपल्याला पुढे काम करायचं आहे असा विश्वास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला असून, 20 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 मध्ये स्थापना झाली. नव्या दमाने कार्यकर्त्यांनी पक्ष उभारलं गेले, राष्ट्रवादी काँग्रेस 14 वर्षे सत्तेमध्ये होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी अनेक विकास कामे आहेत. काम करायचं असेल तर राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडे जावं असं लोकांमध्ये चर्चा नेहमी होत असे. पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्यापेक्षा विधानसभेची तयारी करा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. तर आज संपूर्ण देशात ज्या विचारधारेला आपण सातत्याने विरोध केला त्या विचारधारेचं सरकार आलं असून, गांधी, नेहरु, आंबेडकर, शाहू यांनी व्यापक समाजाचा विचार लोकांमध्ये मांडला. या विचारधारेने पक्ष मजबूत ठेवायचा आहे असं शरद पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी विलीनीकरण होणार नाही यावर पडदा पडला आहे.