गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित सुरक्षा रक्षकाने काल सायंकाळी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरात अशाप्रकारे भयावह शेवट केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद शेकोकर असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव असून ते मूळ बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या ते अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होते. मृत शेकोकर यांची पत्नी देखील पोलीस दलामध्ये असून त्या ताडगाव पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत. प्रमोद शेकोकर यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच मृत प्रमोद शेकोकर हे काही दिवसाअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना काल रात्री ८ वाजेच्या सुमारास शेकोकर यांनी आपल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तर या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि अहेरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण घराचा दरवाजा आतून बंद होता. यामुळे पोलिसांनी दुसऱ्या घरामधून शेकोकर यांच्या घरात प्रवेश करण्यात आला. घरातील चित्र बघून पोलीस देखील हादरून गेले होते.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. तर शेकोकर यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली याची कोणती माहिती अद्याप कळू शकलेली नाही. तसेच आत्महत्येच्या कारणाचा पोलीस शोध घेत असून त्या अनुषंगाने नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.