शिर्डी विमानतळाच्या भोवती सर्व सोयींनी युक्त असं एक शहर वसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. शिर्डी परिसराची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज ७६वी बैठक पार पडली. वर्षा येथील समिती कक्षात ही बैठक झाल्यानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली.
“विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली. एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या विकसित भागाचे नाव असेल”, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे.