Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. निघुते हॉस्पिटलवर छापा

डॉ. निघुते हॉस्पिटलवर छापा
संगमनेर , गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (08:48 IST)
शहरातील नवीन नगर रोड येथील डॉ. निघुते हॉस्पिटलमध्ये गर्भपात होत असल्याच्या तक्रारीवरुन काल बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोलीस, महसूल व वैद्यकीय खात्याच्या अधिकार्‍यांनी हॉस्पिटलवर संयुक्त छापा टाकला. या घटनेने संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राज्यात ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अभियान जोर धरत असतांना संगमनेरमध्ये कळी उमलण्याआधीच खुडली जाण्याचा प्रकार घडत असल्याचे या घटनेने उघड झाले आहे.
 
तालुक्यातील एक महिलेने थेट जिल्हाधिकार्‍यांकडे गर्भपातसंदर्भात तक्रार केली.  जिल्हाधिकार्‍यांना सर्व माहिती सविस्तरपणे सदर महिलेने कथन केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांना कारवाईच्या सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी देखील सदर महिलेला काही सूचना केल्या.
 
दरम्यान बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सदर महिला हि संगमनेरातील डॉ. शांताराम निघुते हॉस्पिटलमध्ये पोहचली. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ती गर्भपातासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. त्याच वेळी तिने ही माहिती नगरहून
 
आलेल्या वैद्यकीय पथकाला भ्रमणध्वनीवरुन दिली. माहिती मिळताच तयारीत असलेल्या वैद्यकीय पथकासह, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, डीवायएसपी डॉ. अजय देवरे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. घोडके, प्रशिक्षणार्थी डीवायएसपी तान्हाजी बर्डे, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला. अचानक झालेल्या प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये एकच धावपळ उडाली. निघुते हॉस्पिटलसमोर पोलिसांची वाहने दाखल झाल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली. या छाप्यानंतर सुमारे 10 तास हॉस्पिटलमध्ये डॉ. शांताराम निघुते यांची कसुन चौकशी सुरु होती.
 
दरम्यान रात्री 9 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे यांनी पत्रकारांना कारवाई संदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकार्‍यांकडे सदर महिलेने तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले. महसूल, पोलीस, वैद्यकीय खाते यांनी संयुक्तरित्या डॉ. निघुते हॉस्पिटलवर छापा टाकला. प्रथम दर्शनी एका महिलेचा गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे निदर्शनास आले. सदर बाबत तपास केला असता वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 या कायद्याचा भंग झाल्याचे दिसून आले. यावरुन वैद्यकीय अधिक्षक यांनी अधिक तपासणी केली असता त्यामध्ये गर्भधारणा पूर्व लिंग निदान कायद्यान्वये काही त्रृटी निदर्शनास आल्या. त्यानुसार सदर कायद्यान्वये प्रक्रिया सुरु करण्यात आली असून संबंधीत डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. गर्भ लिंग कायद्याचा भंग झाल्याने वैद्यकीय अधिक्षक यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती डीवायएसपी देवरे यांनी पत्रकारांना दिली.
 
रात्री उशीरा पर्यंत चाललेल्या या कारवाईनंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन डॉ. शांताराम निघुते यांच्याविरुद्ध वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 व गर्भजल परिक्षा निदान तंत्र अधिनियम 1994 व प्रसुतीपूर्व तंत्र निदान विनीयमन आणि दुरुपयोग प्रतिबंध अधिनियम 1996, भारतीय दंड संहिता 312, 313, 315, 511, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. निघुते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जि.प.साठी २ हजार ६४२ मतदान केंद्रे