सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सुनावणीदरम्यान नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. राणेंच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. हायकोर्टात नितेश राणे यांना दिलासा मिळणार असा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राणे गोव्यात?
आमदार नितेश राणे हे गोव्यात लपले असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने गोव्यातही अनेक ठिकाणी सापळा रचल्याची माहिती समोर आली आहे. कणकवली पोलिसांनी सलग तिसरी नोटीस देऊनही नितेश राणे हजर झालेले नाहीत. सलग 5 दिवस ते बेपत्ता आहेत.
उच्च न्यायालयात अर्ज
अटक टाळण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीनं सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यानंतर आता राणेंच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आमदार राणे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत हा अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवारी तातडीची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.